पोलीस उपनिरीक्षकाकडून (PSI) पत्रकारास बेदम मारहाण

यवतमाळ : पोलीसनामा आॅनलाइन – विरोधी वृत्तलेखन केल्याने येथील पाटण पोलीस स्टेशनच्या पीएसआयने पत्रकारास बेदम मारहाण केली. यासंदर्भात पत्रकाराच्या पत्नीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. या मारहाणीत आपल्या पतीची प्रकृती बिघडली असून त्यांच्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी लष्करे, पीएसआय सुरेश कन्नाके तसेच पतीविरुद्ध तक्रार दाखल करणारा व्यक्ती जबाबदार राहील, असेही या तक्रारीत म्हटले आहे.

पीएसआयच्या मारहाणीमुळे माझ्या पतीचा रक्तदाब, मधुमेह वाढला, त्यामुळे तब्बेत बिघडल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात भर्ती केले. प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांनी रुग्णवाहिकेद्वारे पांढरकवडा रुग्णालयात रेफर केले. तेथील डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत रक्तातील साखर ४०० च्या वर गेल्याने लगेच यवतमाळातील शासकीय रुग्णालयात माझ्या पतीला अतिदक्षता विभागात भर्ती केले. ४ नोव्हेंर ते १२ नोव्हेंबरपर्यंत अतिदक्षता विभागात माझे पती असताना पाटण पोलीस स्टेशनचे चार कर्मचारी पहारा देत होते. रुग्णालयातून सुट्टी होताच दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पाटण पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. झरीच्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांचा मोबाइल जप्त करण्यात आला.
सध्यस्थितीत सुशील ओझा यांची प्रकृती खराब झाली असून त्यांच्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास ठाणेदार लष्करे, कन्नाके व तक्रारकर्ता जबाबदार राहील, असेही नमूद आहे. या तिघांवरही कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी सारीका ओझा यांनी केली असून अन्यथा, उपोषणाचा इशारा दिला आहे.