वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या मुलाच्या मृत्यु प्रकरणी १२ जण ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

पोलीस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांचा मुलगा अथर्व शिंदे यांच्या मृत्यु प्रकरणी पोलिसांनी १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे सध्या चौकशी करण्यात येत आहे, त्यातील कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही़ ज्या तरुणीचा वाढदिवस होता तिच्याकडेही सध्या चौकशी केली जात आहे.

गोरेगाव येथील आरे कॉलनीत अथर्व शिंदे या २१ वर्षाच्या तरुणाचा मृत्युदेह पोलिसांना आढळला होता़ अथर्व मैत्रिणीच्या बेस्ट फ्रेंडच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आरेतील रॉयल पाम येथील बंगल्यावर रविवारी गेला होता़ त्यानंतर त्याचा शोध लागला नव्हता़ त्याचा मृतदेह बुधवारी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कांदिवली (पूर्व) परिसरातील ठाकूर व्हिलेज परिसरात राहत असलेल्या अथर्वचे वडील मुंबई पोलीस दलातील आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेत कार्यरत आहेत. तो साउंड इंजिनीयरिंगच्या तृतीय वर्षात शिकत होता.

जेथे अथर्वचा मृतदेह सापडला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ अथर्व हा दारूच्या नशेत मदतीसाठी रिक्षाचालकांकडे मदतीसाठी विनवणी करीत असल्याचे त्यात दिसून येत आहे.

त्यामध्ये रविवारी संध्याकाळी ७.३०च्या सुमारास अथर्व पार्टीच्या ठिकाणाहून बाहेर पडल्याचे दिसते. मात्र, नशेमुळे त्याला नीट चालताही येत नव्हते. त्याने अनेक रिक्षावाल्यांना थांबवत मुझे कांदिवली छोड दो, असेही सांगितले. मात्र, त्याची अवस्था पाहून हा कोणी गर्दुल्ला असावा आणि आपले रिक्षाभाडे आपल्याला मिळणार नाही, असा विचार करत त्याला कोणत्याही रिक्षावाल्याने गाडीत बसवले नाही. त्यानंतर जंगलातील एका खड्ड्याजवळ तो नैसर्गिक विधीसाठी गेला. मात्र, उतार असल्याने तो तोल जाऊन चार वेळा पडला. त्यानंतर उठून उभे राहण्याचे त्राणही त्याच्यात राहिले नाही. जखमी अवस्थेत पडलेल्या अथर्वला परिसरातील स्त्री-पुरुषांनी पाहिले. मात्र, तो दारूच्या नशेत पडला असावा, असा समज करून त्याच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही आणि अखेर त्याचा मृत्यू झाल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळले आहे.

अथर्वच्या शरीरावर विविध ठिकाणी जखमा होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. त्याच्या गुप्तांगालाही दुखापत झाली असून, त्यामुळे मृत्यू झाल्याचे सिद्धार्थ रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले. मात्र, या जखमा मारहाणीच्या आहेत की नशेत पडल्यामुळे, याची स्पष्टता झाली नसल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.

बर्थडे पार्टीत पालकांचाही सहभाग
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अथर्व ज्या पार्टीत गेला होता ती त्याच्या मैत्रिणीच्या एक बेस्ट फ्रेंडची होती. ती तिच्या वडिलांनी मुलगी १८ वर्षांची झाली म्हणून दिली होती. या पार्टीत सहभागी झालेल्या अनेक मुलांचे पालकही त्या ठिकाणी हजर होते. काही वेळाने मुलांना तिथेच सोडून ते निघून गेले. तर काहींनी रात्री उशिरा येऊन आपल्या मुलांना घरी नेले होते.