स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना जमावकडून मारहाण

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन

अपघातानंतर पळून जाणा-या वाहन चालकाला थांबवले असता गावक-यांनी आणि काही महिलांनी पुणे ग्रामीण दलातील एका अधिका-यासह दोन पोलीस शिपायांना बेदम मारहण केली. या घटनेत पोलीस अधिकारी आणि शिपाई जखमी झाले असून वाहन चालकासह १५ ते २० जणांविरुद्ध मारहाण आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.१४) रात्री नऊच्या सुमारास खालुंब्रे (ता. खेड) गावातील तुळवेवस्ती येथे तळेगाव चाकण रोडवर घडला. या घटनेबाबत ग्रामीण पोलीसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस कर्मचारी रवींद्र शिनगारे, जीप वाहनचालक बाळासाहेब खडके अशी मारहाण झालेल्या पोलिसांची नावे आहेत. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात मोटार वाहनचालक  पोलीस शिपाई बाळासाहेब खडके यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुळवेवस्ती येथे चाकण-तळेगावर रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टरची (एमएच १४ एव्ही ८६८३) धडक एका दुचाकीला (एमएच १४ एफझेड २५४७) बसली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ट्रॅक्टर चालक देवराम तुळवे हा जखमी दुचाकीस्वाराला मदत करण्याऐवजी तेथून पळून जात असताना एलसीबीच्या अधिका-यांनी आणि शिपायांनी पाहिले. पोलिसांनी त्याला आडवले असता ट्रॅक्टरवरील पाच जण तसेच गावातील सुरमारे १५ ते २० यामध्ये दोन ते तीन महिलांनी अधिकारी आणि पोलीस शिपायांना मारहाण केली. घटनेनंतर पोलिसानी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पाच ते सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलिसांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले असल्याचे सुत्रांनी सांगितले.