पुण्यातील ‘त्या’ पोलिस निरीक्षकाची कमाल ! लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडून देण्यासाठी 50 हजार, मध्यस्थास अटक, PI ची चौकशी सुरू
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात सध्या खंडणीचे प्रकरण गाजात असताना पुणे शहर पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकांच्या सांगण्यावरून गाडी सोडण्यासाठी 50 हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षकाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरू केली आहे. तर पैसे घेणाऱ्या एका खासगी व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी आज न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये देखील तसा उल्लेख केला आहे. यामुळे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सुखदेव भिमदान चारण (37, काकडे वस्ती, कोंढवा, मुळ रा. राजस्थान) असे निरीक्षकांच्या सांगण्यावरून पैसे घेतल्यानंतर अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत नरसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (24, रा. रघुवंशन अपार्टमेंट, नांदेवडगाव ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला आहे.
फिर्यादी यांच्या गावाकडील मित्र मनोहर सिंह यांचा राजलक्ष्मी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. दरम्यान शहरात लॉकडाऊन सुरू असतानाही संबंधीत ट्रॅव्हल बस पकडून पोलिसांनी त्यावर कारवाई केली. त्यावेळी सुखदेव हा राजपुरोहित यांना भेटला. तसेच त्यांना पोलिस अधिकारी यांच्या मदतीने बस सोडून देतो असे सांगत आर्थिक लाभासाठी टॅव्हल्स चालकाकडून 50 हजार रूप्ये घेतले. दरम्यान नियमानुसार लॉकडाऊनमध्ये कारवाई करत जप्त केलेले वाहने अडीच हजार रुपये अनामत रक्कम घेऊन सोडली जाते. यानंतर फिर्यादी यांनी अतिवरिष्ट अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यांना याबाबत सांगण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्राथमिक चौकशी केल्यानंतर सुखदेव याला पकडले. त्यावेळी त्याला अटककरून चौकशी केली. त्यात संतोष गड्डा यांच्या ओळखीने बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) मुरलीधर खोकले यांनी गुन्ह्यातील बस सोडण्यासाठी 50 हजार रूपयांची मागणी केल्यावरून ही रक्कम आरोपीने घेतली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान सुखदेव याला आज पकडून न्यायालयात हजर केले. त्यावेळी आरोपीच्या मदतीने निरीक्षक खोकले यांच्याकडे तपास करायचा आहे. चारण याची संतोष लड्डा याने पोलिस निरीक्षक खोकले यांच्याबरोबर ओळख करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चारण याच्या मदतीने गड्डाकडे तपास करायचा आहे. चारण याने बस चालक याच्याकडून 50 हजार रूपये घेऊन तीन दिवस स्वतःकडे ठेवल्याने त्याबाबत तपास करायचा असल्याने न्यायालयात पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.