मलईदार पोलीस ठाण्यासाठी पोलीस निरीक्षकांची सेटींग

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – नांदेड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांना बदल्यांचे वेध लागले आहेत. त्यांना केवळ बदली नको, तर मलईदार पोलीस ठाणे पाहिजे आहे. बदलीसाठी अधिकाऱ्यांनी आपआपल्यापरीने सेटींग लावण्यास सुरूवात केली आहे. यासाठी राजकीय दादा, भाऊंनाही मध्यस्थी घातले जात आहे. नवे पोलीस अधीक्षक आल्यानंतर त्यांनी प्रशासकीय कारणामुळे काही मोजक्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा मोठ्याप्रमाणात बदल्या होणार असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांनी धावपळ सुरू केली आहे.

संगीतकार यशवंत देव चिंताजनक

जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या गणेशोत्सवानंतर होतील अशी माहिती या अधिकाऱ्यांना मिळाली होती. मात्र, त्यानंतरही बदल्या न झाल्याने या अधिकाऱ्यांनी कानोसा घेतला असता नवरात्रौत्सवामुळे बदल्या झाल्या नाहीत असे समजले. आता नवरात्रौत्सव संपला असून बदल्या होतील, असा अंदाज असल्याने पोलीस निरीक्षकांनी आपआपल्या संपर्कातून सेटींग लावण्यास सुरूवात केली आहे. जास्त मलईदार पोलीस ठाणे मिळावे यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. यासाठी काहीपोलीस निरिक्षकांनी मुंबईच्या वाऱ्या वाढवल्या आहेत. त्याच बरोबर स्थानिक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठीही हालचाली सुरू केल्या आहेत. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही फोनाफोनी करून गळ घातली जात असल्याचे समजते.

दरम्यान, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मवाळ स्वभावाचा फायदा काही पोलीस निरीक्षक व खात्यातील काही लोक घेत असल्याची चर्चा आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी शहरासह जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. त्या बदली प्रक्रियेत अनेक पोलीस निरीक्षकांना हवे तसे मलईदार पोलीस ठाणे न मिळाल्याने ते नाराज होते. संजय जाधव रुजू झाल्यापासून या पोलीस निरीक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लॉबिंग करुन हवे ते पोलीस ठाणे मिळविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. काहींनी राजकीय नेत्यांकडे यासाठी घोडेबाजार सुरु केल्याचे समजते.

उद्धव ठाकरेंना वाटते देशात अराजक निर्माण होण्याची भीती

दरम्यान, पोलीस निरीक्षकांनी लावलेल्या राजकीय सेटींगमुळे पोलीस अधीक्षकांवर राजकीय दबाव येऊ लागल्याची चर्चाही सध्या पोलीस वर्तुळात रंगली आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत आपली जिल्ह्यातून बाहेर बदली होऊ नये, या तांत्रिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. निवडणुकांमध्ये आपल्या मर्जीतील पोलीस निरीक्षक मिळावा, यासाठी राजकीय नेतेही प्रयत्नशिल आहेत. सध्या जिल्ह्यात अर्धापूर, कंधार ही पोलीस ठाणे रिकामे असून तसेच अनेक वाहतूक शाखा, देगलूर, सिडको ग्रामीण, भोकर, वजिराबाद, बिलोली येथे आपली वर्णी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन वर्षांपुर्वी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर वादळ उठले होते. हे वादळ पोलीस महासंचालकांपर्यंत पोहोचले होते.