मुलीच्या वाढदिवसादिवशीच पोलीस निरीक्षकाच्या पत्नीचा अपघाती मृत्यू, पोलीस निरीक्षक गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे अहमदनगर महामार्गावर कारच्या भीषण अपघातात बीड जिल्ह्यातील धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. तर जाधव गंभीर जखमी झाले आहेत.
मुलीचा बुधवारी वाढदिवस असल्याने तिला भेटण्यासाठी येत होते. त्यावेळी बुधवारी पहाटेच्या सुमारास शिरुरपासून पुढे बेलवंडी गावाजवळ हा अपघात झाला. मुलीच्या वाढदिवसादिवशीच आईवर काळाने झडप घातली.

सुजाता अनिलकुमार जाधव असे जाधव यांच्या मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव हे बीड जिल्ह्यातील धारूर पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. त्यांना दोन मुली आहेत. त्यातील एक मुलगी पुण्यात राहण्यास आहे. तिचा बुधवारी वाढदिवस होता. दोन दिवसांपासून ते रजेवर होते. मंगळवारी रात्री ते आणि पत्नी सुजाता जाधव हे मुलीला भेटण्यासाठी पुण्याला येत असताना बुधवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास पुणे नगर महामार्गावर शिरुरजवळ बेलवंडी गावाच्या नजीक आल्यावर त्यांची कार डिव्हायडर ओलांडून पलिकडे गेली आणि समोरून येणाऱ्या एका कंटेनगरला धडकली. कारची कंटेनरची जोरदार धडक बसल्याने त्यात दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले.

या घटनेची माहिती शिरूर पोलीसांना नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. त्यावेली पोलीस ठाण्यातील कर्मचारी पोलीस कर्मचारी वैभव मोरे, कडूस, भगत, शिंदे, मोरे, व एक पोलीस मित्र असे सहा जण तीन दुचाकींवरून घटनास्थळी गेले. त्यांनी तात्काळ दोघांनाही बाहेर काढले. तेथून जाणाऱ्या एका अम्ब्यूलन्सला थांबवून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच सुजाता यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर अनिलकुमार जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.

अनिलकुमार जाधव हे मुळचे सांगलीचे रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी सुजाता यांचे शवविच्छेदन करून पोलिसांनी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. त्यांच्यावर गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.