पुण्यातील पेठे ज्वेलर्सवरील दरोड्यात ‘बडतर्फ’ पोलिसाचा ‘सहभाग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पौड रोडवरील आयडियल कॉलनीतील पेठे ज्वेलर्सवर भर दिवसा गोळीबार करुन दरोडा टाकून १० लाख रुपयांचा ऐवज दोघा चोरट्यांनी लंपास केला होता. हा दरोडा जळगाव पोलीस दलातून बडतर्फ केलेल्या पोलिसानेच टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. पेठे ज्वेलर्समधील सीसीटीव्हीमध्ये हा दरोड्याचा सर्व प्रकार कैद झाला होता. त्याचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला. त्यातून जळगावमधील बडतर्फ पोलिसाची ओळख पटली असून त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीस दलाचे एक पथक जळगावला गेले आहे.

कोथरुड येथील पेठे ज्वेलर्सवर २४ नोव्हेंबर रोजी भरदुपारी चार वाजता दोघांनी दुकानात प्रवेश केला. या दोघापैकी एकाने फायरही केला. त्यानंतर ‘गप बसायचे, आवाज नाय पाहिजे, हात वर करायचे आणि सोन्याचा सगळा माल काढून खाली ठेवायचा आवाज केला तर गोळी घालेन’ अशी धमकी देत दुकानातून १० लाख १९ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले होते.

दुकानातून बाहेर पडल्यानंतर ते बराच लांबवर चालत गेले. त्यानंतर ते एका दुचाकीवरुन चांदणी चौकाच्या दिशेने पळून गेले होते. पुणे शहरातील सीसीटीव्हीची तपासणी पोलिसांनी केली असता दुकानातून बाहेर पडल्यानंतर ते चालत जात असल्याचे फुटेज तसेच मोटारसायकलवरुन जातानाचे फुटेज पोलिसांना मिळाले होते. त्यांनी वापरलेली मोटारसायकल ही जळगाव जिल्ह्यातील असल्याचे दिसून आल्यावर पुणे पोलिसांनी जळगाव पोलिसांशी संपर्क साधला. व सर्व सीसीटीव्ही फुटेज व इतर माहिती कळविली. त्यात दरोडेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. या फुटेजवरुन जळगाव पोलिसांनी फायर करणारा दुसरा तिसरा कोणी नसून जळगाव पोलीस दलातून बडतर्फ केलेला पोलीस असल्याचे निष्पन्न झाले.

तीन वर्षांपूर्वी जामनेर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग आढळून आल्याने त्याला बडतर्फ करण्यात आले होते. आता त्याचा पुण्यातील दरोड्यातही सहभाग निष्पन्न झाला आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like