दरोडा घालणारे ‘खाकी वर्दी’तील असल्याचे CCTV मधून उघड झाल्याने प्रचंड खळबळ

पुणे ग्रामीण पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याच्या सहभागाची चर्चा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पारनेर तालुक्यातील निघोज येथील एका व्यापाऱ्याचे गोडावून फोडून सुमारे ६ लाखांच्या मालाची चोरी करण्याच्या घटनेत आरोपी व सुत्रधार हे ‘खाकी वर्दी’तील असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुणे व नगर जिल्ह्याच्या हद्दीवरील नगर जिल्ह्यातील निघोज या गावात रविवारी पहाटे ही घटना घडली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे ‘खाकी’मधील दरोडेखोर कैद झाल्याने चोरीचे बिंग फुटले असून, अनेक बडे पोलीस अधिकारी हे प्रकरण मिटविण्यासाठी दोन दिवस प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. आरोपी हा पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) मध्ये काम करीत असल्याने शिरूर, दौंड, शिक्रापूर, रांजणगाव गणपती, वाघोळी परिसरातील अनेक अवैध धंदेवाल्यांच्या कुंडल्या त्याला माहीत आहेत. त्यामुळे परप्रांतीय लोकांना हाताशी धरून डल्ला मारण्याचा गोरखधंदा त्यांनी जोरात सुरू केला असून, त्यामधून वरिष्ठांची ‘मर्जी’ राखून लाखोंची कमाई दरमहा केली जात असल्याची चर्चा पोलीस दलात रंगली आहे.

पुणे जिल्ह्यातील या पोलीस शिपायाचे नगर जिल्ह्यात काय काम होते. तो कोणत्या चौकशीला तिकडे गेला होता का, वरिष्ठ अधिकाऱ्याची त्याने परवानगी घेतली होती का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, निघोज येथील एका व्यापाऱ्याचे मळगंगा मंदिराजवळ मालाचे गोडाऊन आहे. शनिवारी हे पोलीस महाशय पाहणी करून गेल्याचे समजते. रविवारी पहाटे एक गाडी व त्यामधे दोन तरुणांना घेऊन आले. त्यांनी दोघांसह गाडी गोडाऊनसमोर उभी करून, जवळच असलेल्या पोलीस ठाण्याजवळच्या रखवालदारांशी गप्पा मारल्या. त्यानंतर माल मिळाल्याचे लक्षात येताच पोबारा केला. व्यापाऱ्याने सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर हा पोलीस त्या ठिकाणी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पोलीस या शिपायाची चौकशी करणार का याची चर्चा रंगली आहे.

Loading...
You might also like