मतदारसंघात नसलेल्या राजकिय नेत्यांना मतदान पार पडेपर्यंत मतदारसंघात थांबण्यास मज्जाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीसाठी शहरात प्रचारास आलेल्या मतदार संघात नसलेल्या राजकिय नेते व  कार्यकर्त्यांना मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत न थांबण्याच्या सुचना सहपोलीस आयुक्त  शिवाजी बोडखे यांनी दिल्या आहेत.

पुणे आणि  बारामती लोकसभा मतदार संघाच्या प्रचाराची सांगता २१ एप्रिल रोजी तर शिरुर लोकसभा मतदार संघाच्या जाहीर प्रचाराची सांगता २७ एप्रिल रोजी होणार आहे.  प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते सध्या शहरात वास्तव्यास आहेत. संबंधित नेते, कार्यकर्ते दुसऱ्या मतदार संघातील मतदार आहेत.

पुण्यासह बारामती, शिरुर मतदार लोकसभा संघाचा काही भाग पुणे पोलिसांच्या अख्यत्यारीत येतो. दरम्यान,  मतदार संघाशी संबंध नसलेल्या राजकिय नेत्यांना प्रचार संपल्यापासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदार संघांमध्ये वास्तव्य न करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सोमवारी दिला.

मतदान प्रक्रिया शांततेत तसेच सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून हे आदेश जारी करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने याबाबत काही सूचना दिल्या आहेत. या सुचनांचे पालन न केल्यास भादंवि कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत.

You might also like