मुलगी आणि पत्नीला भेटण्यासाठी जाणारा पोलीस शिपाई पोलीस व्हॅनच्या धडकेत ठार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नीला भेटण्यासाठी सासरवाडीला जात असलेल्या पोलीस शिपायाच्या दुचाकीला समोरून आलेल्या औरंगाबाद दंगा नियंत्रण पथकाच्या व्हॅनने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना मुंबई नागपूर महामार्गावर घडली. ठार झालेला पोलीस शिपाई हा गडचिरोली येथे पोलीस कमांडो म्हणून कार्यरत होता.

सजन मगन सिसोदे (वय ३२, रा. राजेवाडी ता. बदनापुर जि. जालना) असे ठार झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिसोदे हे गडचिरोलीमध्ये सी-६० मध्ये पोलीस कमांडो म्हणून कार्यरत होते. दरम्यान त्यांना ७ महिन्यांची मुलगी आहे. १८ एप्रिल रोजी त्यांनी सुट्टी घेतली होती. त्यांची पत्नी वैजापूर तालुक्यातील जनमवाडी येथे माहेरी होती. ते सुट्टीवर आलेले असताना तिला भेटण्यासाठी ते शुक्रवारी जात होते.

शुक्रवारी रात्री सिसोदे त्यांची दुचाकी (एमएच २१ एजे १३६४) ने मुंबई नागपूर महामार्गावरून जात होते. त्यावेळी आसेगाव फाट्य़ापासून पुढे काही अंतरावर समोरून औरंगाबाद ग्रामीणची दंगा नियंत्रण पथकाची पोलीस व्हॅन येत होती. त्यावेळी व्हॅन आणि सिसोदे यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक बसली. त्यात सिसोदे गंभीर जखमी झाले. तेव्हा फौजदार पंढरीनाथ पाटील यांनी त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना उपचारापुर्वी मृत घोषित केली आहे.