आचारसंहितेच्या नावाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी सराफाला लुटले

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नावाखाली उदगीर शहर पोलीस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांनी सराफाला लुटल्याची घटना समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी दीड लाख रुपये व्यापाऱ्याकडून काढून घेतले व त्यासाठी चार तास एका दुकानात बसून ठेवले. याप्रकरणी संबंधीत सराफाने थेट विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.

सचिन बालाजी चन्नावार यांचे उदगीर शहरातील सराफ लाईन भागात ‘श्री बालाजी ज्वेलर्स’ नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. काल रात्री साडेआठच्या सुमारास दुकान बंद करुन ते दिवसभरात जमलेली सहा लाखांची रोकड घेऊन घराकडे जात होते. उदगीर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी श्रीहरी डावरगावे, महेश खेळगे, बडे, रमेश बिरले यांनी चन्नावार यांना आडवले. शिवाजी चौकातून शाहू चौकाकडे घेऊन जाऊन तेथील एका दुकानामध्ये त्यांना बसवण्यात आले. सहा लाख रुपये जप्त करायचे आहेत असे सांगून त्यांना चार तास दुकानात बसवून ठेवले. चार तासानंतर या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील सहा लाख रुपयांपैकी दीड लाख रुपये घेऊन उर्वरीत रक्कम त्यांना परत करुन सोडून दिले.

सचिन चन्नावार यांनी या घटनेची तक्रार थेट विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली असून संबंधितावर कारवाई करावी व आपली रक्कम आपल्याला परत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. या घटनेने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून आचारसंहितेच्या नावाखाली पोलीसच लुटत असल्याचे उघडकीस आल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.