टॅक्सीमध्ये ६० ‘काडतुसे’ विसरणारा पोलीस तडकाफडकी निलंबित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आरोपीच्या संरक्षणासाठी असलेल्या एक पोलीस कॉन्स्टेबल घाईगडीत टॅक्सीत तब्बल ६० जिवंत काडतुसे विसरला. आता ही काडतुसे गुन्हेगारांच्या हाती लागली तर, या विचाराने मुंबई पोलिसांची झोप उडाली. दुसरीकडे या निष्काळजीपणाबद्दल या पोलीस काँस्टेबलला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. गणेश खेडकर असे त्यांचे नाव आहे.
काडतुसे विसरलेल्या टॅक्सीचा पोलिसांनी दिवसभर शोध घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस टॅक्सीचालकापर्यंत पोहचून त्यांनी काडतुसे ताब्यात घेतली.

भायखळा तुरुंगातील कैदी मेहबुब जमादार याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला रुग्णालयातून भायखळा तुरुंगणात सुरक्षितपणे सोडण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या पोलीस पथकामध्ये गणेश खेडकर यांचा समावेश होता. या पथकाने कैद्याला रुग्णालयातून भायखळा तुरुंगात नेऊन सोडले. त्यानंतर खेडकर यांनी ताडदेव येथील कार्यालयात जाण्यासाठी टॅक्सीत बसले. त्यांच्याबरोबर रायफल आणि ६० काडतुसांचा पट्टा होता. टॅक्सीत त्यांनी सीटच्या मागच्या बाजूला ते ठेवले होते. ताडदेवला कार्यालयात पोहचल्यावर घाईगडबडीत उतरताना त्यांनी रायफल घेतली पण काडतुसाचा पट्टा घेण्यास ते विसरले. ताडदेव येथील सशस्त्र विभागाच्या कार्यालयात रायफल जमा करताना सोबत काडतुसे नसल्याचे खेडकर यांच्या लक्षात आले. तोपर्यंत टॅक्सी निघून गेली होती. त्यांनी याची वरिष्ठांना माहिती देऊन ताडदेव पोलिसांकडे तक्रार दिली.

पोलिसांनी खेडकर यांनी जेथून टॅक्सी पकडली तेथून ताडदेवपर्यंतच्या अनेक सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यात एका फुटेजमध्ये त्यांना टॅक्सीचा नंबर स्पष्ट दिसत होता. त्यावरुन तो नागपाडा येथील असल्याची माहिती आरटीओकडून मिळाली. दुसऱ्या दिवशी पोलीस टॅक्सीचालकाच्या घरी पोहचले. पोलिसांना पाहून तो घाबरला. पोलिसांनी टॅक्सीची तपासणी केली. तेव्हा सीटच्या मागे ठेवलेली काडतुसे आढळून आली. टॅक्सीमध्ये काडतुसे असल्याचे त्यालाही माहिती नव्हते. काडतुसे सुरक्षितपणे मिळाली तरी निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल प्रशासनाने गणेश खेडकर यांना निलंबित केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like