भरदिवसा, भररस्त्यात पोलिसाकडून २५ वर्षीय महिला पोलिसाची छेडछाड व विनयभंग

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – ड्युटीवरून घरी परतणाऱ्या महिला पोलिसाचा तिच्याच सहकारी पोलिसाने छेड काढून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व पीडिता हे बीड शहरातीलच एका पोलीस ठाण्यात यापूर्वी कार्यरत होते.

आरोपी पोलीस नाईक शेख शौकत शेख मुन्सी (वय – ३३) याने पीडित महिलेला भररस्त्यामध्ये आडवून मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणत तिचा विनयभंग केला. यापूर्वी देखील आरोपीने तिची छेड काढली होती. त्यावेळी पीडित महिलेने वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्याचवेळी जर वरिष्ठांनी त्याच्यावर कारवाई केली असता तर हा प्रकार घडला नसता. आतातरी या प्रकरणाची वरिष्ठांनी दखल घेऊ शौकतवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

आरोपी शौकतने ऑक्टोबर महिन्यामध्ये पीडितेचा मोबाईल घेऊन त्यातील तिचे सर्व फोटो स्वत:च्या मोबाईलमध्ये घेतले. यानंतर त्याने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तेसच तिच्यासोबत सोशल मीडियावर जवळीक साधण्याचा प्रयत्न त्याने सुरु केला. त्याच्या वाढत्या त्रासाला कंटाळून महिलेने आपल्या पोलीस पतीला ही सर्व हकीकत सांगितली. यानंतर शौकत विरोधात तक्रार दिल्यनंतर तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी शौकत कडून पुन्हा त्रास देणार नाही असे बॉण्डवर लिहून घेतले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शौकतची बदली अभोरा पोलीस ठाण्यात केली.

बदली केल्यानंतर देखील शौकतने पीडित महिलेचा पाठलाग करणे सोडले नाही. १६ मे रोजी रात्री आठच्या सुमारास पीडित महिला ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी जात होती. त्यावेळी शौकतने जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील संगम हॉलजवळ महिलेची दुचाकी आडवली. तिला गाडीवरून खाली ओढत त्याने तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटका करून तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी घाबरलेल्या शौकतने तेथून पळ काढला.

पीडित महिलेने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी विशाखा समितीपुढे हे प्रकरण मांडल्यानंतर चौकशी करून शनिवारी रात्री शौकत विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बीड पोलीस करीत आहेत.