पोलीस कर्मचाऱ्याचा चाकूने सपासप वार करून पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस कर्मचाऱ्याने चाकूने सपासप वार करून पोलीस उपनिरीक्षकावर धुळे पोलीस मुख्यालयातील मैदानातच जीवघेणा हल्ला केल्याची धक्कायदायक घटना समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केलेल्या गैरवर्तणुकी बाबत वरिष्ठांकडे पाठविलेल्या कसूरी अहवालबाबत पोलीस अधिक्षक कार्यालयाकडुन कारणे दाखवा नोटीस पाठविल्याच्या रागातून हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बनतोडे यांच्यावर पोलीस नाईक संजय खंडु पवार याने हल्ला केला. याप्रकरणी संजय पवार याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक बनतोडे यांची साधारण सहा महिन्यांपुर्वी मुख्यालयात राखीव पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस नाईक संजय खंडु पवार गैरहजर राहिल्याबदद्ल बनतोडे यांनी नोंद घेतली. त्यानंतर संजय पवार याने याच रागातून बनतोडे यांना अपशब्द वापरले होते. उपनिरीक्षक बनतोडे यांनी या गैरवर्तणुकीबाबत संजय पवार यांचा कसूरी अहवाल पोलीस अधिक्षकांकडे पाठविला. या अहवालावर कारवाई करत अधिक्षक कार्यालयाकडून संजय पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याच रागातून पवार यांनी पोलीस मुख्यालयातील आवारात कामकाज करत असलेल्या उपनिरीक्षक यांची कॉलर धरुन जाब विचारत मारहाण करत जवळच असलेल्या चाकुने सपासप वार करत जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला. या हल्यात बनतोडे यांच्या दोन्ही पायांच्या गुडघ्यांवर व हाताच्या पंजावर गंभीर जखम झाली आहे. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देऊन पहाणी केली आहे. बनतोडे यांचेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संजय पवार विरुध्द उपनिरीक्षक बनतोडे यांनी फिर्याद दिली आहे.

Loading...
You might also like