३ हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – शहर पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस नाईक अन्टी करप्शनच्या जाळ्यात सापडला.

बालाजी अनंता मुंढे ( वय ३५ वर्षे, पोलीस नाईक, पोलीस ठाणे उस्मानाबाद शहर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या मित्रावर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात त्यांना मदत करण्यासाठी पोलीस नाईक बालाजी मुंढे याने त्यांना ३ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची तयारी नसल्याने त्यांनी याची तक्रार अन्टी करप्शनकडे केली. त्यानंतर पथकाने याची पडताळणी केली तेव्हा मुंढे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा लावण्यात आला. मुंढे याला तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई औरंगाबाद परिक्षेत्राचे अप्पर पोलीस अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्टी करप्शनचे पोलीस निरीक्षक विनय बहिर व पथकाने केली.