दुर्देवी ! पंढरपूर ते कराड दरम्यान झालेल्या भीषण अपघातात सहाय्यक निरीक्षकाचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात पंढरपूर पोलीस दलातील सहाय्यक निरीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंढरपूर ते कराड हा अपघात झाला. राजेंद्र क्षिरसागर (वय 38) असे मृत्यू झालेल्या सहायक निरीक्षकाचे नाव आहे.

राजेंद्र क्षीरसागर हे मूळचे लातूर जिल्ह्यातील साई गावचे होते. दरम्यान उपनिरीक्षक म्हणून ते पुण्यात देखील नोकरीस होते. यानंतर त्यांची प्रमोशनवर सहायक निरीक्षक म्हणून पंढरपूर पोलीस दलात बदली झाली. सध्या ते पंढरपूर पोलीस दलात नेमणुकीस होते. त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आहे.

दरम्यान काही दिवस सुट्टीसाठी ते सासुरवाडी येथे गेले होते. ते पंढरपूर ते कराड रोडने स्वतःच्या कारने जात होते. यावेळी मौजे कोर्टी येथील सातारा संकुल जवळ त्यांचे कारवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याने त्यांची कार रस्त्याच्या कडेला पलटी होत जाऊन पडली. यात त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.