उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडेंसह 11 दिग्गजांना पोलिसांची नोटीस, न्यायालयात हजर राहावं लागणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या जुन्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे, शिवसेना नेते सचिन अहिर यांच्यासह 11 जणांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

या सर्व नेत्यांनी 2018मध्ये मंत्रालयासमोर तत्कालीन सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. यानंतर पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत. यामुळे त्यांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

अजित पवार आणि अन्य नेत्यांविरोधातील दोषारोपपत्राची प्रत शिवडी न्यायालयातून घेऊन जाण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी कामकाजाच्या कालावधीत या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. ही नोटीस कायदेशीर असली तरी आता हे सर्व नेते सत्तेतील दिग्गज नेते आहेत. अशा वजनदार नेत्यांना पोलिसांची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनाही या नोटीसनुसार न्यायालयात उपस्थित राहावं लागेल.