अटकेनंतर गुन्ह्यातून वाचण्यासाठी आरोपीने लढवली ‘ही’ शक्कल अन् पोलीस अधिकारी बनला ‘मामू’

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – अटक झाल्यानंतर आरोपी गुन्ह्यातून वाचण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. असाच एक प्रकार नंदुरबार येथे उघडकीस आला आहे. अटक केलेल्या आरोपीने वाचण्यासाठी खरे नाव लपवून दुसरे नाव सांगितले. पोलिसांनी डोळेबंद करून आरोपीने सांगितलेल्या नावावर गुन्हा दाखल केला. मात्र नंतर आरोपीने आपले नाव खोटे सांगितल्याचे उघड झाले. आरोपीने सांगितलेल्या नावाची शहानिशा न करता गुन्हा दाखल केल्यामुळे तपासी अधिकारी आरोपीच्या जाळ्यात अडकून ‘मामू’ बनल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

गुजरातमधील व्यापारी नरेश वोढ हे कामानिमित्त धुळे शहरात आले होते. काम संपवून ते नंदुरबारमार्गे गावी जात असताना त्यांना अवलगाजी दर्ग्याजवळ चोरट्यांनी त्यांना लुटले. हा प्रकार गुरुवारी घडला. या घटनेत चोरट्यांनी नरेश वोढ यांच्याकडील १ लाख १० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. दरम्यान गुन्हे शाखेने चार आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता त्याने त्याचे खरे नाव न संगता राहुल रमण साळवे (वय-३१ रा. दत्ता कॉलनी, नंदुरबार) असे सांगितले. पोलिसांनी खातरजमा न करता राहुल साळवे या नावाने गुन्हा दाखल केला. यानंतर तपासी अधिकाऱ्याकडून चौकशी सुरू असताना आरोपीने वाचण्यासाठी आपले खरे नाव न सांगता खोटे नाव सांगितल्याचे समोर आले. चौकशी दरम्यान त्याचे नाव राहुल साळवे नसून शेख हमीद शेख रज्जाक असल्याचे समोर आले. पोलिसांना आपली चूक समजली. मात्र खातरजमा न केल्याने पोलीस अधिकारी ‘मामू’ बनले.