गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागणारा सहाय्यक पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यात मदत करण्यासाठी 30 हजाराची लाच मागणा-या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि. 19) सायंकाळी अटक केली. विशेष म्हणजे ज्या पोलीस ठाण्यात एपीआय म्हणून कार्यरत होते. त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन कोठडीत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली.

संदीप अशोक हजारे असे अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. रायपुर, ( ता. जळगाव) येथे दीड महिन्यापूर्वी दोन गटात वाद झाला होता. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन मारहाण, दंगल व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हयाचा तपास सहायक निरीक्षक संदीप हजारे यांच्याकडे होता. याप्रकरणात मदत करण्यासाठी हजारे यांनी संबंधित व्यक्तीकडे 30 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 15 हजार देण्याचे ठरले होते.

याबाबत तरुणाने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, किरण रासकर, हवालदार सचिन गोसावी, मनोज पाटील, किरण अहिरराव व जाधव यांच्या पथकाने शनिवारी जळगाव गाठून तक्रारदार व हजारे यांची चौकशी केली. तांत्रिक पुरावे उपलब्ध झाल्याने हजारे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक केले आहे.