देव तारी त्याला कोण मारी ! दुचाकीवरून न्यायालयात निघालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा नॉयलॉन मांजामुळे गळा चिरला गेला, पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीवरून न्यायालयात निघालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा नॉयलॉन मांजाने गळा चिरला. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांच्या थोडक्यात जीव वाचला. मुंबईत शनिवारी ही घटना घडली आहे.

राकेश गवळी असे जखमी झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश गवळी हे वरळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. शनिवारी ते दुचाकीवरून न्यायालयात निघाले होते. त्यावेळी जे. जे. मार्ग जंक्शनवर अचानक पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याजवळ आला. दुचाकीवर नियंत्रण मिळवताना कधी मांजाने गळा चिरला हे लक्षात आले नाही. पोलीसाच्या गळ्यातून रक्त येताना पाहून कर्तव्यावरील वाहतूक पोलीस मदतीला धावले. त्यांनी गवळी यांना तात्काळ जे. जे. रुग्णालयात दाखल केले. याची माहिती मिळताच तत्काळ पुढील उपचार मिळावेत यासाठी पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी त्यांना व्होकार्ट रुग्णालयात हलविले. त्यांच्या गळ्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करून 10 टाके टाकण्यात आले आहेत. वेळेत उपचार मिळाल्याने गवळी यांचा जीव थोडक्यात वाचला आहे.