दुर्देवी ! ‘कोरोना’मुळं पंढरपूरमध्ये पोलिसाचा मृत्यू, मुलीचं लग्न न बघताच वडिलांनी घेतला अखेरचा श्वास

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यात पंढरपूर शहर पोलीस दलातील पोलीस नाईक अमिन आप्पा मुलाणी (वय-50) यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. पंढरपूर पोलीस दलात कोरोनामुळे मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.

अमिन मुलाणी यांचा काही दिवसांपूर्वी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान रविवारी (दि.9) पहाटे त्यांचे निधन झाले. मुलाणी यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलाणी यांच्या मुलीचे नुकतेच लग्न जमले होते आणि काही दिवसांनीच तिचा विवाह होणार होता. एकुलत्या एक मुलीचा विवाह सोहळा न बघताच पोलीस वडिलांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुलाणी यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील ते एकमेव आधार होते. पंढरपूर पोलीस ठाण्यातील एकूण चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी दोघेजण कोरोनामुक्त झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती मिळाली आहे. पंढरपूर शहरातील पोलिसाचा कोरोनामुळे पहिलाच बळी गेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून कायदेशीर मदत मिळणे अपेक्षित आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like