पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या WhatsApp स्टेटसनं प्रचंड खळबळ, म्हणाले – ‘आता गुडबाय म्हणायची वेळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव घेतले जात आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईसाठी दबाव वाढत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या बदलीची घोषणाही केली होती. मात्र, या सर्व प्रकारानंतर सचिन वाझे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर एक स्टेट्स ठेवल्याने खळबळ उडाली आहे. ‘आता गुडबाय म्हणायची वेळ’, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदावरून सचिन वाझे यांची बदली करण्यात आली. आता त्यांच्याकडे नागरी सुविधा केंद्राचा पदभार देण्यात आला आहे. या सर्व घडामोडीनंतर सचिन वाझे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर एक स्टेट्स ठेवल्याने खळबळ उडाली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की 3 मार्च 2004 पासून काही सीआयडी अधिकाऱ्यांनी एका खोट्या प्रकरणात मला अटक केली. त्या प्रकरणात आत्तापर्यंत काहीच निष्पन्न झाले नाही. पण आता इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. माझे सहकारी मला पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.

तसेच सध्याच्या परिस्थितीत थोडा फरक आहे. 17 वर्षे माझ्याकडे अपेक्षा, संयम, आयुष्य आणि नोकरीही होती. पण आता माझ्याकडे आयुष्याची ती 17 वर्षेही नाहीत. ना नोकरी, ना संयम. मला असं वाटतंय, आता जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत चालली आहे.

दरम्यान, हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव आल्याने विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. विरोधकांनी त्यांच्या निलंबन आणि अटकेची मागणी केली होती. त्यानुसार गृहमंत्री देशमुख यांनी त्यांच्या बदलीचे आदेश काढले. त्यानंतर आता त्यांनी जग सोडण्याची भाषा केली आहे.