कौतुकास्पद ! खाकीतील अवलिया झटतोय मुक्या जीवांसाठी; कोरोनाकाळात दिला 500 प्राण्यांना आधार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे अनेकांचा जगण्याचा संघर्ष सुरु झाला. दुसरीकडे मुक्या प्राण्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. परंतु, कर्तव्यापलीकडे जाऊन खाकीतील एक अवलिया मुक्या जिवांसाठी झटत आहे. कोरोनाकाळात या अवलियाने आतापर्यंत ५०० हून अधिक प्राण्यांना मदत पोहोचवून त्यांचे प्राण वाचवले आहे. सुधीर कुडाळकर असे या अवलियाचे नाव असून ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत आहे. त्यांनी प्राण्यांसाठी उभारलेल्या या लढ्यात पाल ग्रुप अंतर्गत दोन हजारांहून अधिक जणांची फौज तयार केली आहे.

राज्य पोलीस दलात १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झालेल्या कुडाळकर यांनी कफ परेड, भायखळा आणि सांताक्रुझ पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा, विशेष शाखा एक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) उल्लेखनीय सेवा बजावली आहे. लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील श्वान, मांजर यांच्यापर्यंत पोहोचणारी मदत थांबली. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून या मुक्या जिवांसाठी त्यांनी लढा उभारला. प्राण्यांसंदर्भात राज्यात असलेल्या साधारण ८० ग्रुपमध्ये त्यांचा सहभाग आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांनी पाल अँडॉप्शन नावाने व्हॉट्स अँप ग्रुप तयार केला. रस्त्यावरील आजारी प्राण्यांपर्यंत ते या ग्रुपच्या माध्यमातून मदत पोहोचवत आहेत. सुरुवातीला या ग्रुपमध्ये १६० सदस्य होते. मुंबईत असे एकूण ९ ग्रुप तयार करण्यात आले असून, यात दोन हजारांहून अधिक स्वयंसेवक कार्यरत आहे.

अनेक सोसायट्यांमध्ये मांजर, श्वानाला जेवण दिले तर ते खटकते. तेथील नागरिक खायला देणाऱ्या व्यक्तींना विरोध करतात. प्राण्यांना मारहाणीच्या घटनाही घडत आहेत अशावेळी कायदयाचा धाक असणे आवश्यक आहे. त्यासाठी नोव्हेंबरमध्ये २५ वकिलांची लीगल टीम तयार असून मोफत मार्गदर्शन करण्यात येत असते असे सुधीर कुडाळकर यांनी सांगितले. आतापर्यंत १२५ प्रकरणांपैकी ९० टक्के प्रकरणे मार्गी लावली आहेत.

अपघात झाला किंवा एखाद्या प्राण्यावर अत्याचार झाल्याचे ग्रुपवर समजल्यास तत्काळ त्यावर मार्ग काढण्याबाबत चर्चा सुरू होते. त्या प्राण्यापर्यंत तत्काळ मदत पोहोचवून रुग्णालयात दाखल केले जाते. त्यानंतर उपचाराच्या खर्चासंदर्भात ग्रुपवर चर्चा झाल्यानंतर मदतीसाठी आवाहन करण्यात येते.यात, कोणी किती मदत केली याच्या माहितीसह संबंधित प्राण्याच्या प्रकृतीबाबत सर्व अपडेट दिले जातात. इतक्या सर्व गोष्टींचे पालन का केले जाते असे कुडाळकरांना विचारले असता ते म्हणाले, मदतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात प्राणी संघटनांकडून काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे अशाप्रकारे सर्व तपशील ठेवणे गरजेचे आहे. प्राण्यांना प्रत्येकाने पुढे येऊन मदत करायला हवी. प्राण्यांसंबंधित कायद्यांबाबत जनजागृती व्हायला हवी. रस्त्यावर वावरणाऱ्या अंध, अपंग श्वानासाठी शेल्टर उभारण्याचे स्वप्न असून लवकरच संस्था स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.