प्रवासाच्या पासबद्दल पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, जाणून घ्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या जागतिक साथीमुळे २५ मार्चपासून गेले ७० दिवस घरांच्या दरवाजांच्या आड ‘लॉक’ असलेला देश आता प्रमुख तीन टप्प्यात लॉकडाऊन ५.० मध्ये ‘अनलॉक होणार आहे. परंतु, पुणे जिल्हा अंतर्गत, पुण्याबाहेर किंवा पुण्यात येण्यासाठी पोलिस पास गरजेचा असल्याचं पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पुणे शहरातील नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापर्यंत सुरु करण्यात आलेली नाही. पुणे जिल्हा आणि परिसरात बारामती, इंदापूर, वालचंदनगर याच भागात एसटीची सेवा सुरु आहे. नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याच्या कारणामुळे, पर्यायी व्यवस्था म्हणून खाजगी वाहनाचा वापर करावा लागत असल्याचं दिसून येत आहे. अशावेळी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक इतरत्र प्रवास करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. म्हणून पुढील आदेश येईपर्यंत पुण्यातील प्रवासासाठी पास काढणे गरजेचं आहे.

तसेच पास कोणत्या कारणासाठी काढण्यात येत आहे, संबंधित वाहनातून किती प्रवासी प्रवास करणार आहे. यासाठी पूर्वीचे नियम कायम राहणार असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं.

केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्या जाहीर केलेल्या सवलती देण्यास महाराष्ट्र सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध कायम राहतील. तसेच एकूण संख्येच्या निम्मीच दुकान सुरु राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद राहतील. प्रार्थनास्थळे सर्वांसाठी उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. खासगी कार्यालये दहा टक्के क्षमतेने सुरु करण्यात येणार आहे. कार्यालये सुरु होणार असल्याने आता नोकदारांची कामाच्या ठिकाणी शहरात येण्यासाठी वर्दळ सुरु झाली आहे. मात्र, शहरात येण्यासाठी पास आवश्यक आहे की, नाही याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे नियम वेगवेगळे असल्यामुळे, नागरिकांचा गोंधळ पाहायला मिळत आहे.

पुण्यात येण्यासाठी किंवा पुण्यातून बाहेर जाण्यासाठी अद्याप पूर्णतः वाहतूक सुरळीत करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवासाबाबत पूर्वी जे नियम आहेत तेच पुढील आदेश येईपर्यंत काय असणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत देखील पास मिळण्यासाठी अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत. छाननी करून त्यांना मंजुरी देण्यात येणार आहे.
-बच्चन सिंग, पोलिस उपयुक्त, गुन्हे शाखा