२० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यमध्ये कलम कमी करुन आरोपींना अटक न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई आज हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या सांस्कृतिक भवनाजवळील चौकात करण्यात आली.

संजय चिंतामणराव गायधने असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी एका लेबर कॉन्ट्रॅक्टरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या वाहनाचा हुडकेश्वर परिसरात अपघात झाला होता. याप्रकरणात त्यांच्या आतेभावाविरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार संजय गायधने हे करित आहेत. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार आणि त्यांच्या आतेभावाला अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी गायधनेने २० हजार रुपयांची लाच मागितली. तसेच लाचेची रक्कम दिल्यास ठाण्यातून जामीन देऊ असे अश्वासन गायधने याने तक्रारदाराला दिले.

लाचेची रक्कम द्यायची नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून तक्रार नोंदवली. त्यावरून अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. आज पहाटे लाचेची रक्कम घेऊन गायधनेने तक्रारदाराला पोलीस ठाण्याजवळ बोलविले. तक्रारदार आणि त्यांचा आतेभाऊ मंगळवारी सकाळी ९ वाजता पोलीस ठाण्यात पोहचले असता गायधने त्यांना घेऊन बाजूच्या सांस्कृतिक भवनाजवळच्या चौकात गेला. तेथे त्याने लाचेची रक्कम स्वीकारताच बाजूलाच घुटमळणाऱ्या एसीबीच्या पथकाने गायधनेला पकडले. त्याच्याकडून लाचेची रक्कम जप्त केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी उपायुक्त श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फाल्गुन घोडमारे, नायक रविकांत डहाट, मनोज कारणकर, मंगेश कळंबे, सहायक फौजदार परसराम शाही आदींनी ही कामगिरी बजावली.