दिग्विजय सिंहांच्या रॅलीत ‘भगवे’ पोलीस

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमध्ये लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावारण चांगलंच तापलं आहे. भोपाळमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार दिग्वीजय सिंह यांच्या रॅलीमध्ये साध्या वेशात आलेले पोलीस कर्मचारी चक्क भगवे उपरणे घालून आल्याचं चित्र पहायला मिळालं.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह आणि कॉंग्रेसचे दिग्विजय सिंह यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. दरम्यान भोपाळमध्ये दिग्विजय सिंह यांनी कम्प्यूटर बाबा यांना सोबत घेऊन आज रोड शो केला. त्यावेळी या रॅलीच्या बंदोबस्तासाठी असलेले साध्या वेशातील पोलीस होते. त्या पोलिसांनी भगवे उपरणं घातलं होतं.

आम्हाला साध्या वेशात आणि भगवं उपरणं घालून येण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या असं एका महिला पोलिसाने सांगितलं. परंतु भोपाळच्या पोलीस उपमहासंचालकांनी याबाबत इन्कार केला आहे. रोड शो साठी बंदोबस्त पुरविण्यात आला होता. त्यासाठी पोलीस साध्या वेशात उपस्थित होते. मात्र त्यांनी बगवं उपरणं घातलेलं नव्हत. असं उपमहासंचालकांनी सांगितलं.