२ हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस कर्मचारी गजाआड

जत (सांगली) : पोलीसनामा ऑनलाईन – जामिनावर सोडल्याबद्दल दोन हजार रुपयांची लाच मागणारा जत पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक राजेश वसंत कांबळे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार आज (मंगळवार) गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

तक्रारदार यांच्यावर जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना जामीनावर सोडले तसेच तक्रारदार यांच्या विरोधात असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी कांबळे याने ३ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये २ हजार रुपये देण्याचे ठरले होते. याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २२ नोव्हेंबर २०१८ ला केली होती.

तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीवरुन पथकाने २३ नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी कांबळे याने तक्रारदाराला ३ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती २ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. कांबळे विरुद्ध कारवाई करण्यासाठी पथकाने सापळा रचला होता. मात्र कांबळे याला संशय आल्याने त्याने पैसे स्विकारले नाहीत. परंतु लाचेची मागणी केल्याने पोलीस नाईक राजेश कांबळे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार आज गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अपर पोलीस अधीक्षक राजकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक राजेंद्र साळुखे, पोलीस कर्मचारी जितेंद्र काळे, भास्कर भोरे, संजय कलकुटगी, संजय संकपाळ, अविनाश सागर, बाळासाहेब पवार यांनी केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.