भरधाव एसटी बसच्या धडकेत पोलीस गंभीर जखमी

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसची धडक एका दुचाकीला बसली . या अपघातामध्ये दुचाकीवरील विश्वनाथ सुरज बंशी (रा. अहेर) हे गंभीर जखमी झाले. बंशी हे पोलीस उपमुख्यालयात शिपाई पदावर कार्य़रत आहेत. हा अपघात आज (सोमवार) सकाळी अहेरी-सिरोंचा मार्गावरील नागेपल्ली येथील शाळेसमोर झाला.

आज सकाळी ८.३० वाजता अहेरीहून-सिरोंचाकडे एसटी बस (एमएच : ४० – ६०९४) जात होती. एसटी बस आलापल्ली मार्गाकडे जात असताना नागेपल्ली येथील राजे धर्मराव शाळेसमोर बस आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला.

दरम्यान, याच मार्गाने माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा ताफा जात होता. अपघात झाल्याचे दिसताच धर्मराव बाबा यांनी लगेच गाडी थांबवून आपले वाहन उपलब्ध करून दिले आणि याच वाहनातून अहेरी उपजिल्हा रुग्णलयात जखमीस दाखल करण्यात आले.