pune : अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या एकाला लोहमार्ग पोलिसांनी पकडले. पंकज रंगराज पाटील (वय २३, रा. रहाटणी) असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक मौला सय्यद यांनी पोलिसनामा ऑनलाईनला सांगितले की, फिर्यादी यांचे मामा, त्यांचा मुलगा व पिडित मुलगी हे १६ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील मुळगावी रेल्वेने जात होते. सायंकाळी ५ वाजता ते पटणा एक्सप्रेस गाडीने जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनच्या फलाट १ वर आले होते. ते सर्व जण बोगीमध्ये चढले. त्यावेळी पिडित मुलगी बाथरुमला जाते असे सांगून गाडीतून खाली उतरली. ती परत न आल्याने फिर्यादीचे मामा यांनी फिर्यादींना फोनवरुन कळविले.

त्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी ही तक्रार २१ ऑगस्टला दाखल करुन घेतली. पोलिसांनी फिर्यादीकडे केलेल्या चौकशीत पंकज पाटील याचे नाव निष्पन्न झाले. त्यावरुन पोलिसांनी तांत्रिक तपास करुन त्याचा रहाटणी येथील घराचा शोध घेतला. २२ ऑगस्ट ला त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने पिडित मुलीला भोसरी येथे एका रुमवर ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर या मुलीला भोसरी येथून ताब्यात घेण्यात आले.

पोलीस अधीक्षक दीपक साकोरे , व पोलीस निरीक्षक मौला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनिल कदम, आनंद कांबळे, फिरोज शेख, निलेश बिडकर, स्वप्निल कुंजीर, महिला शिपाई सोनवणे यांनी हा तपास केला.