अबब… डीएसकेंच्या विरूध्द 36 हजार 875 पानांचे दोषारोपपत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या विरूध्द न्यायालयात तब्बल 36 हजार 875 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. अतिरिक्‍त न्यायाधीश जे.टी. उत्पात यांच्या न्यायालयात ते दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून पोलिसांना ते दोषारोपपत्र शिवाजीनगर येथील न्यायालयात नेण्यासाठी 4 चारचाकी वाहनांचा वापर करावा लागला आहे. दोषारोपपत्रात तब्बल 2 हजार 43 कोटींचा हा घोटाळा असल्याचे उल्‍लेख पोलिसांनी केला आहे. दरम्यान, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूकीच्या गुन्हयात पोलिसांनी डीएसकेंच्या फायनान्स विभागाचा प्रमुख विनयकुमार बडगंडे याला अटक केली आहे.

डीएसके आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर अखेर त्यांच्याविरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर डीएसकेंनी न्यायालयात अटकपुर्व जामिन अर्ज सादर केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना दिल्‍ली येथुन अटक केली. त्यानंतर त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. कोठडीत रवानगी झाल्यानंतर फरासखाना लॉकअपमध्ये डीएसके कोसळले. तेव्हा त्यांना तात्काळ ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. म्हणजेच त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी सायंकाळी डीएसकेंच्या जवळच्या तीन नातेवाईकांना अटक केली. केदार वांजपे, साई वांजपे आणि धनंजय पाचपोर अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी गुरूवारी विनयकुमार बडगंडे यांना अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने डीएसकेंच्या विरूध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्‍त रश्मी शुक्ला, सह आयुक्‍त रविंद्र कदम, गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्‍त प्रदीप देशपांडे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक आयुक्‍त निलेश मोरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी डीएसकेंच्या घोटाळयाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.

पहा कशाप्रकारे डीएसकेनी केली फसवणूक

ठेवी व कर्ज स्वरुपातील 1083.7 कोटी रु, वित्तीय संस्थ व बॅंकाच्या माध्यमातून 711.26 कोटी, डिबेंन्चर्स (कर्ज रोखे) याच्याद्वारे 111.35 कोटी आणि फुरसुंगी येथील जमिनीच्या व्यवहारातुन केलेल्या अपहारातून 136.77 कोटी असा एकूण 2,043.18 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच लोकांच्या ठेवी स्वीकारण्यासाठी डीएसकेनी बाजारात विविध नावाच्या एकूण सात कंपन्या स्थापन केल्या होत्या. या सर्व कंपन्याचे महत्वाचे संचालक डीएसकेचे नातेवाईकच आहेत. तसेच डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या खात्यातून जास्त पैशाचा अपहार करण्यात आला आहे.