भिवंडी पोलिसांची हुक्का पार्लरवर धडक कारवाई, 3 कोटींचा माल जप्त

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – हुक्का पार्लरला बंदी असूनही भिवंडी शहरात अशा बेकायदेशीर पार्लरची संख्या वाढतच होती. पोलिसांनी कारवाई करत अशा पार्लरचं कंबरडं मोडलं आहे. पोलिसांनी पार्लरसाठी लागणारा 3 कोटींचा माल जप्त केला आहे. भिवंडी पोलीस उपायुक्त क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी धडक कारवाई करत पार्लरमध्ये वापरलं जाणारं साहित्य जप्त केलं आहे. अल अकबर नावानं उपयोगात येणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थाचा गोदामात मोठा साठा करून ठेवल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना मिळाली होती.

त्यांनी वळ ग्रामपंचायत क्षेत्रातील पारसनाथ गोदाम संकुलातील इमारत क्र E-4 मधील गाळा क्रमांक 14,15 व इमारत क्र D-3 मधील गाळा क्रमांक 6-7 या चार गोदामांवर व पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं एकूण 4 गोदामात साठवलेलं हुक्का पार्लरचं साहित्य जप्त केलं आहे. यात अल अकबर कंपनीच्या सुगंधीत तंबाखूचा 3 कोटी 8 लाख 96 हजार 760 रुपयांच्या साठ्याचा समावेश आहे. गोदाम मालक इरफान मो. अमीन सिद्दीकी आणि गोदाम व्यवस्थापक फैसल रईस खान या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शीरसाठ हे करत असून या गुन्ह्यातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. एवढा मोठा साठा जप्त केल्यानंतर या माध्यमातून बंदी असलेल्या हुक्का पार्लर चालकांचं कंबरडं मोडलं जाणार आहे.