DySp च्या पथकाकडून पाबळ मध्ये मटक्यावर छापा

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पाबळ ता. शिरूर येथील पोलीस दूरक्षेत्र शेजारीच असलेल्या एका ठिकाणी मटका सुरु असल्याची माहिती दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना मिळाली, त्यांनतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याठिकाणी पोलिसांच्या मदतीने छापा टाकत सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांवर गुन्हे दाखल केले आहे.

पाबळ ता. शिरूर येथील बस स्थानकाच्या शेजारी मटका अड्डा सुरु असल्याची माहिती दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना मिळाली, त्यांनतर दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कर्मचारी गणेश कडाळे, एच. आर. भोंगळे, आर. एस. शिंदे, होमगार्ड एच. आर. कापरे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पाबळ येथील पोलीस दूरक्षेत्र येथे येत माहिती दिली, त्यांनतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर, पोलीस कर्मचारी भास्कर बुधवंत यांना माहिती देत मटका अड्डा सुरु असलेल्या ठिकाणी जात छापा टाकला त्यावेळी त्यांना तेथे तीन व्यक्ती हातामध्ये कागदे घेऊन त्यावर मटक्याचे आकडे लिहित असल्याचे दिसले यावेळी पोलिसांची चाहूल लागताच तेथील व्यक्ती पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना जागेवर पकडले.

यावेळी पोलिसांनी तेथील २१८० रुपये रोख रक्कम व मटक्याचे साहित्य मिळून ७३१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी भास्कर महादेव बुधवंत रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी प्रशांत अंकुश गायकवाड, दत्तात्रय रघुनाथ बगाटे, मुनीर बाबूलाल इनामदार तिघे रा. पाबळ ता. शिरूर जि. पुणे यांच्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर हे करत आहे.

चौकीशेजारी मटका असून पोलिसांकडून कारवाई का नाही ?
पाबळ ता. शिरूर येथे ज्या ठिकाणी मटका अड्डा सुरु आहे, त्या पासूनच काही अंतरावर पोलीस चौकी असून त्या ठिकाणी चोवीस तास पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत असताना पोलिसांकडून या मटका अड्ड्यावर कारवाई का नाही असा सवाल नागरिकांना पडला आहे.