सासवड जवळ हातभट्टीवर पोलिसांचा छापा

- १ लाख ७ हजारांचा माल नष्ट

पुरंदर : पोलिसनामा ऑनलाईन – सासवड  गावच्या हद्दीतील  कुंभोशी ओढ्याजवळील हातभट्टी सासवड पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक लाख सात हजार पाचशे रूपयांचा माल नष्ट केला आहे. तर याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश संजय राजावत असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सासवड गावच्या हद्दीत कुंभोशी ओढ्याजवळ हातभट्टीची दारू तयार करण्यात येत आहे. अशी माहिती खब-यांमार्फत सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांना मिळाली. त्यांनी लागलीच तेथे  छापा घातला. त्यावेळी हातभट्टीच्या  दारुचे रसायन काठीने ठवळत असलेला  एक इसम आढळला. तो पळून जात असताना पोलिसांनी त्यास  झडप घालून पकडले व त्यास नांव व पत्ता विचारला असता त्याने  योगेश संजय राजावत (वय -२२)  रा. कापुरहोळ ता.पुरंदर, जि.पुणे असे सांगितले. यानंतर पोलिसांनी जप्त केलेले रसायन ओतून देऊन संजय राजावत विरुद्ध  मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सासवड पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दत्तात्रय माने करीत आहे.