वेश्यावस्तीवर पोलिसांचा छापा, १० महिलांची सुटका

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन-शहरातील काळ्या खाणीजवळ असलेल्या प्रेमनगर येथील वेश्या वस्तीवर शनिवारी सायंकाळी पोलिसांच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षातर्फे छापा टाकण्यात आला. बांग्लादेश, नेपाळ, झारखंड, राजस्थान येथील महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून कुंटणखाना चालवल्याप्रकरणी दोन महिलांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी परराज्यातील दहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

माला मादर, गोदा आवळे अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. प्रेमनगर येथे या दोघीही संशयित पश्‍चिम बंगाल, नेपाळ सीमा भाग, कर्नाटक, मुंबई येथून महिला, मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणून कुंटणखाना चालवत असल्याची माहिती जाधव यांना मिळाली होती. त्यानंतर जाधव यांनी शनिवारी सायंकाळी पथकासह प्रेमनगर परिसरात छापा टाकला. यावेळी संशयावरून १२ वारांगनांना ताब्यात घेण्यात आले होते.

ताब्यात घेतलेल्या महिलांकडे रविवारी पहाटेपर्यंत चौकशी सुरू होती. त्यांच्या चौकशीत बांग्लादेश, नेपाळ, झारखंड, राजस्थान येथून जबरदस्तीने आणलेल्या दहा महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर माला मादर व गोदा आवळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाचे परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, सहाय्यक निरीक्षक विद्या जाधव, उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, निवास माने, दीपक परीट, भगवान नाडगे, विकास पाटणकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

बांग्लादेशच्या महिलांकडे कागदपत्रे तपासणी दरम्यान या कारवाईत काही बांग्लादेशी महिलांनाही वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

या महिलांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान त्या महिलांचा पासपोर्ट, व्हिसा आदी कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. त्याच्या सत्यतेबाबत खात्री पटल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यांनी सांगितले.