यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई, बडया सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन –   यवतमाळ शहरात विविध भागात चालणा-या कुंटणखान्यावर पोलिसांनी रविवारी (दि. 27) सायंकाळी अचानक छापा मारून मोठी कारवाई केली. पोलिसांनी अचानक टाकलेल्या धाडीमुळे आंबटशौकींनामध्ये खळबळ उडाली आहे. मात्र कारवाईत नेमकी किती जणांना अटक झाली, त्यांच्याविरूद्ध कुठले गुन्हे दाखल केले गेले याबाबत पोलिसांकडून माहिती मिळू शकली नाही.

जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. याकरिता लोहारा, अवधुतवाडी, शहर आणि यवतमाळ ग्रामीण ठाणेदारांवर जबाबदारी सोपवली होती. शहर ठाणेदार धनंजय सायरे यांच्या नेतृत्त्वातील पथकाने दारव्हा मार्गावरील जसराणा अपार्टमेंटमध्ये चालत असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकली. तेथून महिलेसह दोघांना ताब्यात घेतले. तर लोहारा ठाणेदार मिलन कोयल व ग्रामीण ठाणेदार गजानन करेवाड यांच्या पथकाने लोहारा परिसरातील देवीनगर भागात चालणाऱ्या कुंटणखान्यावर धाड घालून काही संशयितांना ताब्यात घेतले. अवधुतवाडी पोलिसांच्या पथकाने जामनकरनगर, उमरसरा येथील कुंटणखान्यांचा सर्च केला. या धाडसत्राचे नियंत्रण अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धारणे यांनी केले.

देहविक्रीचे अड्डे चालविणा-यांनी घेतला कारवाईचा धसका

यवतमाळातील नामांकित वस्त्यांमध्ये देहविक्रीचा व्यवसाय फोफावला आहे. पोलिसांनी ज्या ठिकाणी छापा टाकला ते ठिकाण कुप्रसिद्ध असून या परिसरात गेल्या काही वर्षांपासून देहविक्रीचा व्यवसाय चालविला जातो. आतापर्यंत ठोस अशी कारवाई होत नसल्याने देहविक्रीचे अड्डे चालविणाऱ्यांचेही चांगलेच फावत होते. अचानक झालेल्या कारवाईचा धसका अड्डाचालकांनी घेतला आहे.