Pimpri : तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

मावळ/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.16) शिरगाव परंदवडी येथे करण्यात आली आहे. पोलिसांनी जुगार अड्डा चालवणाऱ्या आणि जुगार खेळणाऱ्या 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जुगार अड्डा चालवणारा संतोष बाळू केदारी (वय-38 रा. कुसगाव, ता. मावळ) याच्यासह 10 जणांवर शिरगाव परंदवडी पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव परंदवडी हद्दीत कासारसाई ते पाचानी या गावाला जाणाऱ्या रस्त्यालगत पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या तीन पत्ती जुगार खेळला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती.

त्यानुसार दोन पथके तयार जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी तीन पत्त्यांचा जुगार खेळताना 11 जण आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत 6 लाख 8 हजार 280 रुपयांची रोख रक्कम, 1 लाख 3 हजार 500 रुपयांचे मोबाईल, 23 लाख 13 हजार रुपये किमतीचे 5 चारचाकी वाहने आणि 2 दुचाकी आणि जुगार साहित्य असा एकूण 30 लाख 24 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी 2 वॅगनार, 1 बलेनो, 1 सेलेरिओ, 1 स्विफ्ट कार जप्त केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, डॉ. अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे, पोलीस हवालदार संदिप गवारी, अनंत यादव, पोलीस नाईक भगवंता मुठे, दिपक साबळे, महेश बारकुले, अनिल महाजन, गणेश कारोटे, अमोल शिंदे, महिला पोलीस नाईक वैष्णवी गावडे, सोनाली माने, योगिनी कचरे यांच्या पथकाने केली.