डेअरीवर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी उडाली ‘भंबेरी’, शॅम्पूनं दूध बनवत असल्याचं पाहून अधिकारी ‘हैराण-परेशान’

भिंड : पोलीसनामा ऑनलाइन – आतापर्यंत तुम्ही दूधात पाण्याची भेसळ केल्याचे प्रकार पाहिले आणि ऐकले असतील, परंतु मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात भेसळीचा एक असा प्रकार समोर आला आहे, जो जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

भिंड जिल्ह्यातील डेअरी प्रकल्पावर छापेमारी केली असता गाईच्या दुधात डिटर्जंट, यूरिया, हायड्रोजन लूब्रिकन्ट, क्रिप्टो ऑईल सारखे घातक रासायनिक पदार्थ खुलेआम मिसळले जात असल्याचे आढळून आले आहे.

भिंड जिल्हा पोलीस आणि प्रशासनाने एका मोठ्या डेअरी प्रकल्पातील बनावट दूध बनविण्याच्या उद्योगाचा पर्दाफाश केला आहे, हे नफेखोर लोकांच्या आरोग्याशी खेळत होते. हे व्यवसायिक बनावट दूध बनवून बाजारात पुरवत होते. एवढेच नव्हे तर, बनावट दूध अनेक प्रकारच्या घातक केमिकलचा वापर करून तयार केले जात होते.

पोलीस आणि प्रशासनाने डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट दूध बनविण्याचे साहित्य जस्त केले आहे, यामध्ये पोत्यांमध्ये भरलेली पावडर, सिंथेटिक दूध बनविण्याच्या 300 लीटर केमिकलसह बनावट दूध बनविण्याचे इतर साहित्य सापडले आहे.

जिल्हा पोलीस आणि प्रशासनाने मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई केली. भिंडच्या फूप येथील रामनगर परिसरात एका डेअरीमध्ये अनेक दिवसांपासून बनावट दूध बनविण्याचा उद्योग सुरू होता, ज्याबाबत कुणालाही माहिती नव्हती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांना या अड्ड्याचा सुगावा लागला. यानंतर पोलिसांनी छापा मारून संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला.

लहारचे उप जिल्हाधिकारी ओम नारायण सिंह यांनी सांगितले की, पोलीस दलाने फूप तालुक्यातील रामनगर परिसरात सुरू असलेल्या सुधीर डेअरीवर छापा मारला. ज्यावेळी छापा मारण्यात आला तेव्हा मोठ्या प्रमाणात सिंथेटिक दूध तयार करण्यात येत होते. तर, डेअरीत पथकाला दूधाने भरलेला टँकरही सापडला, ज्याचे नमूने घेण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

स्पिरिट पाहून अधिकारी हैराण
छाप्यादरम्यान जेव्हा फूपचे बीएमओ डॉ. डीके शर्मा यांनी इथेनॉलचे डब्बे पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी सांगितले की, एवढे प्युअर स्पिरिट रूग्णालयांमध्ये जखम स्वच्छ करण्यासाठी आणि ऑपरेशनचे साहित्य स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते. सामान्यपणे इथेनॉल किंवा अल्कोहलचा उपयोग दारूमध्ये केला जातो.

उपजिल्हाधिकारी ओम नारायण सिंह यांनी सांगितले की, कारखान्याजवळ एवढी दुर्गंधी येत होती की, तेथे उभे रहाणे सुद्धा अवघड झाले होते. हे काम अनेक महिन्यांपासून येथे चालले होते. तरीही याबाबत कुणी तक्रार केली नव्हती. या छाप्यानंतर बनावट दूध रस्त्यावर ओतण्यात आले.

काय सांगतात डॉक्टर…
डॉक्टर एस. एस. जैन यांनी सांगितले की, इथेनॉल स्पिरिट असते. जर याचे नियमित सेवन केले तर आतड्या, लिव्हर, फुफ्फुसाचे आजार होतात. एवढेच नव्हे तर कॅन्सरसुद्धा होऊ शकतो.