५० रुपये घेऊन पावती न देणे पोलिसाला पडले महागात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – रिक्षाचलकाला कारवाईची कायदेशीर पावती न देण्यासाठी १०० रुपयांची मागणी करत फक्त ५० रुपयांची लाच घेणे ठाणे शहर वाहतुक शाखेच्या पोलीस शिपायाला महागात पडले. एसीबीच्या पथकाने त्याला पन्नास रुपये स्विकारताना रंगेहात पकडल्यानंतर न्यायालयाने त्याला शनिवारी १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

गिरीश अहिरराव असे त्याचे नाव आहे. याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शुक्रवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली होती.

राबोडीतील क्रांतीनगर येथील रिक्षाचालकाने १२ फेब्रुवारी रोजी रिक्षा चालवताना आरटीओ नियमानुसार सफेद रंगाचा गणवेश परिधान केला नव्हता. त्यावेळी ठाणे पश्चिम रेल्वेस्थानकासमोर वाहतुक नियमन करणाऱ्या अहिरराव यांनी रिक्षाचलकाला अडवून गणवेश नसल्याच्या कारणावरून १०० रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोड झाल्याने अहिराव यांनी त्याच्याकडून ५० रुपयांची लाच घेतली. मात्र त्याची कोणतीही रितसर पावती दिली नाही. त्यामुळे रिक्षाचालकाने एसीबीकडे याची तक्रार केली. त्यानुसार, पडताळणी केल्यानंतर अहिरराव यांनी पन्नास रुपयांची लाच स्विकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर त्याला न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.