पोलिसांच्या त्रासाला कंटाळून RTI कार्यकर्त्यांची ‘आत्महत्या’, सर्वत्र खळबळ

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  –  उस्मानपुरा पोलिसांनी खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करुन बदनामी केली तसेच पोलिसांच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना जयभवानीनगर येथे गुरुवारी रात्री ९ वाजता उघडकीस आली़ सुसाईट नोटमधून हा प्रकार उघड झाला आहे.

पंकज साहेबराव संकपाळे (वय २९) असे या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. पंकज संकपाळे हा टायपिंगचे काम करीत असे. तसेच आरटीआय कार्यकर्ता म्हणून काम करीत होता. उस्मानपुरा पोलीस ठाण्यातील डी बी पथकातील अधिकाऱ्यांनी २०१७ मध्ये त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. हा खोटा गुन्हा असल्याचे तो सातत्याने सांगत होता. त्यानंतरही पोलीस त्याला सातत्याने त्रास देत होते. या खटल्यामुळे आपली समाजात बदनामी झाली. या अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्याने सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे.

पंकज गुरुवारी घरीच होता. त्यांच्या परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यावेळी पंकजने खोलीतील पंख्याला गळफास घेतला. रात्री ९ वाजता हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आला. त्याला तातडीने घाटी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.