Pimpri News : पिस्तूलाच्या धाक दाखवून उच्चशिक्षित तरुणीचे कार्यालयातून अपहरण, आरोपी ताब्यात

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमप्रकरणातून भरदिवसा पिस्तूलाचा धाक दाखवून एका उच्चशिक्षित तरुणीचे तिच्या ऑफिसमधून अपहरण केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) सकाळी साडे अकराच्या सुमारास पिंपरी चिंचवडमध्ये घडली होती. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासचक्र फिरवून पीडित तरुणीची सुटका करुन शंतनू चिंचवडे (वय-25) याला ताब्यात घेतले आहे. आरोपी आणि मुलीचे काही महिन्यापूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीने त्याच्या सोबतचे संबध तोडले. चिडलेल्या आरोपी शंतनूने मुलीचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेली तरुणी उच्चशिक्षित असून इंटिरिअर डिझायनर आहे. ती एका ठिकाणी नोकरी करते. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आरोपी शंतनू तिच्या ऑफिसमध्ये गेला. त्याने बंदुकीचा धाक दाखवून ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसमोर मुलीचे अपहरण केले. अपहरण केलेल्या मुलीला घेऊन आरोपी तळेगाव परिसरात गेला.

दरम्यान, या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी मुलीच्या वडिलांना दिली. वडिलांनी चिंचवड पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुलीचा शोध सुरु केला. आरोपी मुलीला घेऊन तळेगाव परिसरात गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तळेगाव परिसरात शोध घेऊन मुलीची सुटका केली. तर आरोपीला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे पोलीस चौकशी करत आहेत.