कौतुकास्पद ! खाडीत उडी मारून पोलिसांनी वाचवला तरुणीचा जीव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिसांना माणुसकी नसते असे अनेकवेळा नागरिक बोलत असतात. त्याचबरोबर पोलिसांची प्रतिमा हि लाच घेणारे अशीच तयार केलेली असते. त्यामुळे नागरिक बऱ्याचदा आपल्याबरोबर गुन्हा घडून देखील पोलिसांकडे मदत मागण्यासाठी जात नाहीत. मात्र नवी मुंबईतील वाशी पुलावरून उडी मारणाऱ्या तरुणीला वाचवून पोलिसांनी आपल्या बद्दलच्या गैरसमजाला दूर केले आहे. काल संध्याकाळी या पुलावरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणीला पोलिसांनी वाचवून जीवदान दिले आहे. कुसलूम खान असे या २१ वर्षीय तरुणीचे नाव असून तिने वाशीच्या खाडीपुलावरून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

काल संध्याकाळी हि तरुणी पुलावर आपल्या नवऱ्याबरोबर व्हिडीओ कॉलवर बोलत होती. याचदरम्यान त्यांच्यात वाद झाल्याने तिने आत्महत्या करण्यासाठी थेट पुलावरून खाडीत उडी घेतली. त्याचवेळी तेथे वाहतूक नियंत्रण करणाऱ्या सचिन पवार याच्या हि गोष्ट लक्षात आली. त्याने याची माहिती वाहतूक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस हवालदार सूर्यकांत बारस्कर, शिवाजी बसरे आणि दर्शन म्हात्रे यांनी या तरुणीला वाचवण्यासाठी थेट खाडीत उडी मारली.

दरम्यान, हि तरुणी चेंबूरमधील रहिवासी असून शुद्धीवर आल्यानंतर तिला नातेवाईकांच्या स्वाधीन केले असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.