कानगोष्टींच्या खेळामध्ये पोलिसांची झाली धावपळ

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षात फोन खणानतो… समोरचा व्यक्ती सांगतो हिंजवडीमध्ये युवक दुचाकीला पाकिस्तानचा झेंडा लावून फिरत आहे. हा फोन असतो पुणे नियंत्रण कक्षातून. पिंपरी नियंत्रण कक्षातून हा संदेश हिंजवडी पोलिसांना मिळतो आणि सुरू होते त्या युवकाची शोध मोहीम. हिंजवडी पोलिसांसोबत इतरही पोलीस स्टेशनचे पोलीस युवकाच्या शोध मोहिमेत सहभागी होतात. ते ही आपल्या परीने युवकाचा शोध घेतात. पण तो युवक सापडत नाही. तपास केल्यानंतर असे समजते हा प्रकार हिजवडीत नसून कोथरूड-हिंजवडी रोडवरचा आहे. पण हा युवक दुचाकीला नाही तर दुचाकीच्या पाय ठेवण्याच्या जागेवर पाकिस्तानचा झेंडा ठेऊन फिरत होता. पुणे नियंत्रण कक्षाने दिलेला मेसेज हिंजवडी पोलिसांपर्यंत पोचेपर्यंत बदलला आणि पोलिसांची धावपळ. या कानगोष्टींच्या खेळामध्ये मात्र पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली.

पाकिस्तानचा झेंडा दुचाकीला लावून युवक फिरत असल्याचा फोन हिंजवडी पोलिसांना नियंत्रणकक्षाकडून आला आणि सर्वांची एकच धावपळ उडाली. परंतू, नागरिकाने कोथरूड ते हिंजवडी मार्गावर घडलेला हा प्रकार पुणे नियंत्रणकक्षाला कळवला. पुण्याने ही माहिती पिंपरी-चिंचवड आणि तेथून हिंजवडी पोलिसांना देण्यात आली. पण हे करताना झालेल्या सरकारी चुकांमुळे सर्वांची एकच धावपळ उडाली. हिंजवडी पोलिसांनी फोन करणाऱ्याकडेच थेट चौकशी केल्यावर हा सर्व उलगडा झाला आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर देशभर त्याचे पडसाद उमटत आहेत. पाकिस्तानचे झेंडे जाळण्यापासून निषेधसभेचे आयोजन सध्या केले जात आहे. अशातच दोघा तरूणांनी पाकिस्तानचा झेंडा दुचाकीच्या फुटरेस्टवर (पाय ठेवण्याची जागा) येथे ठेवून कोथरूड-अलंकार पोलिस ठाणे परिसरातून हिंजवडीच्या दिशेने फेरफटका मारत जात असल्याची माहिती एका नागरिकाने शनिवारी (१६ फेब्रुवारी) पुणे पोलिसांच्या नियंत्रणकक्षाला दिली. तेथून पुढे पुणे पोलिसांच्या नियंत्रणकक्षाने ही माहिती पिंपरी-चिंचवड नियंत्रणकक्षाला दिली. त्यांनी ही माहिती तत्काळ हिंजवडी पोलिसांना कळवली. मात्र, यामध्ये झेंडा पाय ठेवण्याच्या जागेवर ठेवल्याचे नागरिकाने सांगितले असताना तो झेंडा गाडीला लावून युवक फिरत असल्याचे पोलिसांनी एकमेकांना कळविले. यामुळे हिंजवडी पोलिसांसह अन्य पोलिस पथकांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. तेव्हा असा प्रकारच घडला नसल्याचे उघड झाले.

”कानगोष्टींच्या खेळामध्ये एकाने सांगितलेली माहिती शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचताना त्याचा अर्थच बदलला जातो तसाच काहीसा हा प्रकार घडला असून, यामुळे मला मात्र नाहक त्रास झाला” अशा शब्दात प्रतिक्रिया ती माहिती पोलिसांना कळविणाऱ्या व्यक्तीने व्यक्त केली आहे.

दरम्यान, हा प्रकार हिंजवडी परिसरात घडला नसल्याचे संबंधित गस्त पथकाने कळविले होते. परंतू, दुसऱ्या दिवशी रविवारी ही चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली. त्यामुळे हिंजवडी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याला पुणे नियंत्रणकक्षात जाऊन याची माहिती घेण्यासाठी पाठविले होते. तेथे पुणे नियंत्रणकक्षाला फोन करून माहिती कळविणाऱ्याबाबत माहिती काढून त्याच्याशी संपर्क केला असता, हा प्रकार हिंजवडी नाही तर कोथरूड-हिंजवडी मार्गावर घडल्याचे त्याने सांगितले. तसेचे गाडीला झेंडा बांधून नाही तर दुचाकीवर पाय ठेवण्याच्या जागेवर झेंडा ठेवल्याचे कळविल्याचेही त्या व्यक्तीने सांगितले, अशी माहिती हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिली