भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना पोलिस दलातर्फे ‘सलामी’

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 2 जानेवारी 1943 रोजी हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा वीर हिराजी पाटील यांना सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली होती त्यांच्या बलिदानाची आठवण ठेऊन दरवर्षी सिद्धगड येथे सिद्धगड स्मारक समिती विविध कार्यक्रम आयोजित करते स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक, ठाणे व रायगड जिल्ह्यातील शाळांचे शिक्षक वर्ग, विद्यार्थी, मशाल ज्योती आणणारी मंडळे, कुस्ती स्पर्धक पैलवान, व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास हजेरी लावतात मात्र कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सिद्धगड येथे मोजक्या लोकांच्या उपस्थिती मध्ये सुरक्षित अंतर ठेऊन हा कार्यक्रम पार पडला.

रायगड जिल्ह्यातील मानीवलि येथील भरत भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना भजनाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. तालुक्यातील सिद्धगड येथे शनिवारी 2 जानेवारी रोजी पहाटे 6 .10 वाजता आमदार किसन कथोरे यांचे हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित करून हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलिस दलातर्फे हुतात्म्यांना सलामी देण्यात आली या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय भरत भगत, राजेंद्र ठाकरे, सिद्धगड स्मारक समितीचे सचिव मुरलीधर दळवी, ठाणे जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे आदि उपस्थित होते.

सिद्धगड बलिदान भूमीवर दरवर्षी 1 व 2 जानेवारी रोजी बलिदान दिना निमित्त आयोजित केले जाणारे सर्व सार्वजनिक कार्यक्रम यावर्षी कोरोनाच्या साथी मुळे रद्द करण्यात आल्याचे सिद्धगड स्मारक समिती मुरबाड तर्फे जाहिर केले होते याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी देशप्रेमी नागरिकानीं हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा वीर हिराजी पाटील गावात जेथे स्वातंत्र्य लढ्यातील स्मारक आहे तेथे पहाटे 6 वाजून 10 मिनिटांनी सिद्धगड रणसंग्रामात आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले.