नाभिक समाजातील तरुण पिढी शासनाच्या सेवेत यावी यासाठी पोलीस संतोष पंडित यांची बक्षीस योजना

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन(संदीप झगडे) –   नाभिक समाजातील युवक व युवतींनी केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन शासनाच्या सेवेत यावे .याकरिता तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी यवत पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असणारे संतोष पंडित यांनी बक्षीस योजना जाहीर केली आहे .

नाभिक समाजातील खूपच कमी प्रमाणात तरुण उच्चशिक्षण घेत आहेत . बहुतांशी तरुण पारंपरिक सलून व्यवसाय करीत आहेत . शासकीय सेवेत नाभिक समाजातील युवक व युवतीचे प्रमाण खूपच कमी आहेत समाजातील युवक व युवतींनी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षा देऊन शासनाच्या सेवेत यावेत या हेतूने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय स्पर्धेत यश मिळविलेल्यासाठी रोख दहा हजार तर राज्य सेवा परीक्षेत यश मिळविलेल्यासाठी सात हजार रुपये तसेच समाजाच्या मेळाव्यात कुटुंबासह सन्मान करण्यात येणार आहे . कै दिलीप मारुती पंडित यांच्या स्मरणार्थ ही योजना असल्याचे संतोष पंडित यांनी सांगितले .

संतोष पंडित यांनी जाहीर केलेल्या योजनेला नाभिक समाजातील युवक युवतींनी प्रतिसाद देऊन सहभागी व्हावे,पुणे जिल्हा नाभिक महामंडळाच्या वतीने स्पर्धा परीक्षेसाठी सहकार्य केले जाईल असे जिल्हाध्यक्ष पै निलेश पांडे यांनी सांगितले .