खाकीतील माणुसकी ! सर्पदंश झाल्याने रस्त्यावर तडफडणाऱ्या तरुणाला पाेलिसामुळे जीवदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्पदंश झाल्याने रस्त्यावर पालापाचोळ्यात तडफडत पडलेल्या तरुणाला एका पोलीस शिपायामुळे मदत मिळाली आहे. पोलीस शिपायाने त्या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तो तरुण सुखरुप घरी पोहोचेपर्यंत त्याची भावासारखी सेवाही केली. वेळेत उपचार मिळाल्याने त्या तरुणाला जीवदान मिळाले आहे. जनसेवेचा वसा घेतलेल्या आणि माणसातील माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या या पाेलिसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

याेगेश खेडकर (रा. मूळ पुणे) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. खेडकर 2011 मध्ये पोलीस दलात दाखल झाले असून 2019 पासून ते गोराई पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तर सुरेंद्र प्रताप असे सर्पदंश झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, तौक्ते चक्रीवादळामुळे पडझड झाल्याने झाडाआड दडून बसलेल्या सापावर किराणा माल घेऊन घराकडे निघालेल्या सुरेंद्रचा पाय पडला. पायाला सर्पदंश झाला. वाचवा… वाचवा… म्हणून ताे जीवाच्या आकांताने ओरडत हाेता. दरम्यान, दुचाकीवरून घराकडे निघालेल्या पोलीस शिपाई खेडकर यांनी सुरेंद्रचा आवाज ऐकला. त्यांनी त्या तरुणाकडे धाव घेत त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. सुरेंद्र सुखरूप घरी पोहोचेपर्यंत त्याची सेवा केली. खेडकर म्हणाले की, आदल्या दिवशी रात्रपाळी करून घरी आलो होतो. त्यानंतर 18 मे रोजी सुट्टी होती. मात्र कामानिमित्त बाहेर पडलो. काम उरकून घराकडे परतत होतो. त्यावेळी दुपारच्या सुमारास मनेरे गावाकडील रस्त्यावर पडलेल्या पाल्यापाचोळ्यात तडफडत पडलेल्या तरुणाकडे लक्ष गेले. तात्काळ त्याच्याकडे धाव घेतली. त्याच्या पायाला आणि हाताच्या बोटाला साप चावल्याचे समजले. लगेचच दाेरी शाेधली आणि विष शरीरात पसरू नये यासाठी ज्या ठिकाणी साप चावला होता, त्याच्या काही भाग वरती दोरीने घट्ट बांधून त्याला रुग्णालयात नेले. रुग्णालयात सर्पदंशावरील औषध उपलब्ध नव्हते. 3 रुग्णालये फिरल्यावर चौथ्या रुग्णालयात औषध मिळाले. उपचार सुरू झाले. ताे वाचला याचे लाखमाेलाचे समाधान मिळाल्याचे खेडकर यांनी सांगितले.