‘शिवशक्ती’ सोसायटीच्या ‘त्या’ संचालकांचा पोलिसांकडून शोध सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिवशक्ती को ऑप. सोसायटी फसवणूक प्रकरणी विद्यमान अध्यक्ष विजय कलाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश वाकडकर यांच्यासह इतर संचालकांवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या भीतीने आरोपी फरार झाले आहेत. या संचालकांचा पोलिसांकडून कसून शोध सुरु आहे.

बाणेर येथील शिवशक्ती को-ऑप सोसायटीचा विद्यमान अध्यक्ष विजय सुभाष कलाटे, उपाध्यक्ष नारायण चंगा जरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश बाळासाहेब वाकडकर व संचालक संतोष ज्ञानेश्वर बारणे, सुमित प्रकाश तरस यांच्याविरोधात चतु:श्रुंगी पोलीस स्टेशन येथे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. किरण शिंदे यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी संचालकांवर गुन्हा दाखल केला.

शिवशक्ती क्रेडीट सोसायटीच्या विद्यमान अध्यक्ष आणि संचालकांनी स्वतःच्या फायद्यासाठी संगनमताने खोटा व बनावट सभा वृत्तांत तयार करून तो खरा असल्याचे भासवून त्या द्वारे संस्थेचा, सभासदांचा विश्वासघात करून, पदाचा गैरवापर करून, न्यायालयीन कामकाजासाठी खोटे सभा वृत्तांत वापरून न्यायालयाची दिशाभूल केली म्हणून त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३४, ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७ व ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे संचालक किरण शिंदे यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. सहकार आयुक्तांनी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून गुन्हा दाखल करण्याबाबत परवानगी दिली होती. त्यानंतर पुणे येथील मे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पुणे यांनी सदर बाबीची दखल घेऊन आरोपीच्या विरोधात दखलपात्र गुन्हा नोंदवण्याचे आदेश चतु:श्रुंगी पोलीस ठाणे यांना दिले. फौजदारी दखलपात्र गुन्ह्यात कोणत्याही क्षणी अटकेची भीती असल्याने सदर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून तपास करत आहेत.