पोलिसांनी पकडले ५ लाखांचे वाघाचे कातडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाघाचे कातडे विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना पकडून त्यांच्याकडून ५ लाख रुपये किंमतीचे वाघाचे कातडे हस्तगत केले आहे. रामेश्वर हरिश्चंद्र देशमुख (वय ३५) आणि विजय गणपत जगताप (वय ३८, रा. औरंगाबाद) अशी त्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखेतील पोलिसांना दोघे जण वाघाचे कातडे घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक यश बोराटे, लहू सातपुते व गुन्हे शाखेच्या युनिट १ चे कर्मचारी यांनी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा लावला. मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांकडे एक मोठे गाठोडे होते. संशयावरुन त्यांना पोलिसांनी अडविले.

त्यांच्याकडच्या गाठोड्याची तपासणी केली तेव्हा त्यात वाघाचे कातडे आढळून आले. समर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघाचे कातडे हे खरे आहे का याची तपासणी करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलविण्यात येणार आहे. हे कातडे त्यांनी कोठून आणले, याचा तपास पोलीस करत आहेत.