दौंडमध्ये पैसे वाटणारे 6 जण पोलिसांच्या ताब्यात

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड शहरात मतदारांना प्रत्येकी पाचशे रूपये प्रमाणे पैसे वाटणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दौंड उपविभागाच्या पोलिस उप अधीक्षक तथा परिविक्षाधीन आयपीएस ऐश्वर्या शर्मा यांनी स्वतः केलेल्या या कारवाईत रोख दीड लाख रूपये जप्त करण्यात आले आहे.

दौंड शहराच्या रेल्वे कर्मचारी वसाहत मधील घंटे चाळ येथे काल (ता. २०) मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याची माहितीपरिविक्षाधीन आयपीएस ऐश्वर्या शर्मा यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस पथकासह दुपारी पावणेचार वाजता छापा टाकून ही कारवाई केली.

छाप्यात २६ मतदार स्लिपा, ५०० रूपयांच्या ३०० नोटा आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. पैसे वाटणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिघे पळून गेले. उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक या प्रकरणी पुढील तपास करीत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

पैशांसाठी भरपावसात रांग….

दौंड शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. मतदार छत्र्या घेऊन रांगेत उभे होते. प्रत्येकी पाचशे रूपयांप्रमाणे वाटप सुरू असल्याने संबंधित मतदारांचे ओळखपत्र पाहून व पैसे वाटणाऱ्यांनी केलेल्या खात्रीनंतर पैसे वाटण्यात आले होते.

visit : Policenama.com