थरारक ! पिस्तुलांसह नाचणार्‍या मनोरुग्णावर पोलिसांनी झाडली गोळी (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बँकेच्या सुरक्षा रक्षकावर गोळीबार करीत इमारतीच्या छतावर जाऊन दोन तास पिस्तुल हातात घेऊन नाचणार्‍या एका मनोरुग्ण व्यक्तीवर पोलिसांनी गोळी झाडली. यामध्ये जखमी झालेल्या या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली.


एकजण हातात पिस्तूल घेऊन धुमाकूळ घालत असल्याची बातमी मेरठ शहरात वार्‍यासारखी पसरली. तेव्हा काही स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस दिसताच त्या व्यक्तीने पोलिसांवरही गोळीबार करायला सुरुवात केली. त्याच्या दोन्ही हातात दोन गावठी कट्टे होते. त्यानंतर बँकेच्या छतावरुन खाली उतरवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये गोळी त्याच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफिने त्याला ताब्यात घेतले. तत्पूर्वी, त्याने बँकेच्या सुरक्षा रक्षकावरही गोळीबार केला होता. त्यामुळे बँकेसह परिसरात भीती पसरली होती.

पायाला गोळी लागल्याने तो मनोरुग्ण व्यक्ती जखमी झाला असला तरी त्याची प्रकृती स्थिर आहे. अशा प्रकारे मनोरुग्णाच्या हातात पिस्तूल आणि त्याच्याकडून होत असलेला गोळीबार यामुळे स्थानिक लोक घाबरुन गेले होते. त्यामुळे त्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला आणि याची माहिती दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.