पोलिसांनी देखील त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करणे गरजेचे : मुख्यमंत्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाढत्या शहरीकरणानंतर एक नवीन समाज व्यवस्था निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी देखील त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. पोलीस दल म्हणजे सामान्य नागरिकांना सेवा देणारी यंत्रणा आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या सामान्यांना न्याय देण्याचे काम पोलिसांनी करणे गरजेचे आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. पुणे पोलीस आयुक्तालयात एकाच छताखाली महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘भरोसा सेल’ सेवा संकुलाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी पालक मंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे, राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर ,पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे आदी याप्रसंगी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ब्रिटीशांनी पोलीस दलाचा वापर जरब बसविण्यासाठी केला. त्यावेळचे पोलीस दल वेगळे होते. गेल्या काही वर्षात पोलीस दलात नवनवीन सुधारणा तसेच बदल होत गेले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल झाले. कायद्यााची अमलबजावणी करणारे, कारवाई करणारे पोलीस अशी प्रतिमा बदलली. पोलीस दल एक सेवा देणारी यंत्रणा आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात तसेच पोलिसांकडे तक्रार, समस्या घेऊन येणाऱ्या सामान्यांना न्याय देण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.

पोलीस महासंचालक पडसलगीकर यांनी पुणे पोलिसांकडून सुरु करण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. सामान्यांना न्याय देण्यासाठी पोलिसांनी आधिकाधिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत पडसलगीकर यांनी व्यक्त केले. पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त देशपांडे यांनी आभारप्रदर्शन केले.

पोलिसांकडून करण्यात येणारी पारपत्र पडताळणीचा कालावधी पाच दिवसांवर आणण्यात पोलिसांना यश आले आहे. अपघात कमी करण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा अधिक चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या सेवा उपक्रमातून गेल्या काही महिन्यात १६ हजार तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे, असे पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी नमूद केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us